Friday, May 10, 2013

पत्रकार संरक्षण कायद्याचे विधेयक येत्या कॅबिनेट समोर येणार-मुख्यमंत्री

पत्रकारांना संरक्षण देणाऱ्या कायद्याचे विधेयक येत्या कॅबिनेट समोर मांडण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सह्याद्रीवर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या शिष्ट मंडळाशी बोलताना दिले.पत्रकार संरक्षण कायदा करावा व पत्रकारांसाठी पेन्शन योजना राबवावी या मागणीसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने आज पनवेल ते वर्षा अशी कार रॅली काढण्यात आली होती.या रॅलीत ९० कार आणि २५० पत्रकार सहभागी झाले होते.पनवेल-वाशी-दादर मार्गे रॅली CST येथे आली असता गृहमंत्री आर.आर.पाटील रॅलीला सामोरे आले आणि त्यांनी पत्रकारांच्या मागण्या रास्त असून त्यांना संरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका मांडली.यानंतर पोलिसांनी रॅलीला आझाद मैदानासमोर रोकले पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे शिष्टमंडळ नंतर मुख्यमंत्र्यांना भेटण्यास गेले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी येत्या कॅबिनेट समोर विधेयक आणण्याचे मान्य केले .तसेच अन्य राज्यातील पेन्शन योजनांचा अभ्यास करून महाराष्ट्रात पत्रकारांना पेन्शन योजना राबवण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले. एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वा खाली पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे शिष्ट मंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले. देशमुख यांच्या समवेत पुणे मराठी पत्रकार परिषदेचे सचिव किरण नाईक उपाध्यक्ष सुभाष भारद्द्वाज, शहर अध्यक्ष राजेंद्रकृष्ण कापसे जिल्हा अध्यक्ष शरद पाबळे उपस्थित होते