Thursday, July 17, 2014

जर्नालिस्ट वेलफेअर स्कीम लवकरच,

प्रकाश जावडेकरांच्या घोषणेचे

परिषद आणि पुणे जिल्हा पत्रकार संघातर्फे स्वागत



पत्रकारांसाठी जर्नालिस्ट वेलफेअर स्कीम आणण्याची तसेच पत्रकार संरक्षण कायदा कऱण्याच्यादृष्टीने पत्रकारांवरील हल्ल्याची नोंद एनसीआरबी मार्फत ठेवण्याची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल लोकसभेत केली आहे.मराठी पत्रकार परिषद तसेच पुणे जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने या घोषणांचे स्वागत कऱण्यात आले असून प्रकाश जावडेकर यांचे आभारही मानण्यात आले आहेत.

महाराष्ट्रासह देशभरात सर्वत्र पत्रकारांवर सातत्यानं हल्ले होत आहेत.या विरोधात पत्रकार संरक्षण कायदा करण्याची मागणी सर्वप्रथम मराठी पत्रकार परिषदेने 2005 मध्ये केली होती.त्यानंतर एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती स्थापन झाली आणि या समितीने त्याचा सातत्यनं पाठपुरावा केला.मात्र महाराष्ट्र सरकारने केवळ कोरड्या आश्वासनाशिवाय काहीच केेले नाही.या पार्श्वभूमीवर 15 जून रोजी पुण्यात पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि पुणे जिल्हा पत्रकार संघाने एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जावडेकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.त्यावेळी आपण पत्रकार पेन्शन योजना आणि पत्रकार संरक्षण कायदा करणार असल्याचे जावडेकर यांनी घोषित केले होते.

त्यानंतर बुधवारी जावडेकर यांनी देशातील पत्रकारांसाठी जर्नालिस्ट वेलफेअऱ स्कीम आणि पत्रकार संरक्षण कायदा करण्यासाठी नोंदी ठेवण्याची घोषणा केली.या दोन्ही घोषणा पत्रकार हिताच्या असल्याने मराठी पत्रकार परिषद आणि पुणे जिल्हा पत्रकार संघ या घोषणांचे स्वागत करीत आहे यासंबंधिचा कायदा लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी मराठी पत्रकार परिषद तसेच पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या संयुक्त पत्रकात कऱण्यात आली आहे.या पत्रकावर परिषदचे अध्यक्ष किरण नाईक, माजी अध्यक्ष एस.एम.देशमुख, कार्याध्यक्ष चंद्रशेखर बेहेर, सरचिटणीस संतोष पवार, उपाध्यक्ष सुभाष भारव्दाज, कोषाध्यक्ष सिध्दार्थ शर्मा कार्यालयीन सचीव श्रीराम कुमठेकरतसेच पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद पाबळे, पुणे शहर अध्यक्ष राजेंद्रकृष्ण कापसे, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय सुर्वे, कार्याध्यक्ष बापूसाहेब गोरे, सुनील वाळूंज दत्तात्रेय जोरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.