'तुम्हाला ढगात फिरायचे असेल तर लांब कुठे जाण्याची गरज नाही. सध्या पावसाळा सुरू झाल्याने सिंहगडावर पावसाळी ढग खाली येत असून त्यातून चालण्याचा वेगळा अनुभव आपणास येथे मिळत आहे.
मागील आठवड्याच्या सुरवातीला पावसाने पुन्हा दडी मारली होती. शुक्रवार पासून पुन्हा पावसाला सुरवात झाल्याने शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी पूर्ण पावसाळी वातावरण झाले आणि पर्यटकांचा जथ्थे येत होते.
घाट रस्त्यात कोंढणपूर फाट्याजवळ थांबले की, गडाला ढगांचा वेढा पडतो. ढगात गड हरवून जातो. मग पावसाची सर येते. काही वेळ ती बरसत राहते. मग काही वेळाने वारा वाहतो. गडालगतचे ढग पुढे जातात आणि गड पुन्हा दिसू लागतो. पाऊस पडून ऊन पडले की, सूर्यप्रकाशात गड चमकू लागतो. जणू काही गड पावसाच्या सरीने धूऊन काढल्याचे दिसते.
गडावर गेल्यावर पार्किंग मधून वर जाताना डाव्याबाजूला।डोंगराच्या दगडावर अनेक वनस्पती दगडाला चिकटून उगवत आहेत. पावसाच्या सरीचे पाणी खडकातून टिपकत असते.
पायऱ्या चढताना गार वारा लागतो काही वेळा तो भिंती आड दडून बसतो. पावसाळ्यात गड चढताना दम कमी लागतो. उन्हाळ्यात मात्र तीन दरवाजे चढताना दमवितो. हिरव्यागार लहान लहान रोपे वाऱ्यावर डुलून आपले स्वागत करीत असतात. लहान पक्षी पावसात भिजलेले अंग झाडून कामाला लागतात. तर पाया खाली लाल रंगाच्या आळी तिला अनेक पाय असलेल्या पैसा नावाचे गटाने जमिनीत ये- जा करत असतात. गडावरील झाडाचे शेंडे ढगात हरवून जातात.
गडावरील मंदिर, स्मारके भिजल्याने ती मूळ रूप आणि काळ्या रंगात दिसल्याने सुंदर दिसतात. गडावरील टाक्यांमध्ये पाणी साठायला सुरवात झाली आहे. गडाच्या गस्तीच्या वाटेने भटकताना पावसाची रूपे पहावयास मिळतात. गडाच्या मागील बाजूस असलेल्या तानाजी कडा कडे गेले की, वारा- ढग गडाच्या तटाला धडकून वर जाताना दिसतात. शेजारी हवा पॉईटला वारा जोराचा असतो. अशी एक दिवसाची पावसातील भटकंती झाली की, भूक लागलेली असते.
देव टाक्याचे पाणी त्या पाण्यातील कांदा भजी, बेसन भाकरी, वांग्याचे भरीत आणि दही हे मात्र भूक भरून काढतात.
पावसाच्या सरी, गार वारा आणि हिरवागार निसर्ग सोबतीला आहे.
मोसमी पावसाला उशिरा सुरुवात झाल्याने यंदा सिंहगडावरील पर्यटकांची गर्दी देखील उशिरा सुरू झाली. मागील आठवड्यात पावसाला सुरुवात झाल्याने यंदाच्या मोसमातील पहिल्या शनिवार- रविवारी सुमारे वीस हजाराहून अधिक पर्यटकांनी सिंहगडास भेट दिली होती.