Sunday, January 27, 2013
बिबट्या, मगर पकडण्याचा प्रश्नच नाही - उपवनसंरक्षक------------
ref sakal
------------------------------------------------------
खामगाव मावळ - सिंहगडच्या जंगलात दिसलेला बिबट्याच्या पायाचा ठसा.
खडकवासला - सिंहगडच्या जंगलातील बिबट्या आणि खडकवासला धरणात दिसलेली मगर पकडण्याचा अद्याप कोणताच प्रस्ताव नाही. हे दोन्ही वन्यजीव मानवीवस्तीत आलेले नाहीत, त्यामुळे त्यांना पकडण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही, असे वन विभागाचे उपवनसंरक्षक राजेंद्र कदम यांनी सांगितले.
सिंहगडच्या पश्चिमेला असलेल्या जंगलात पाळीव प्राण्यांवर झालेला हल्ला बिबट्याने केला आहे. या परिसरातील अनेक प्राण्यांच्या पायाचे ठसे आढळले आहेत. त्यातील एक ठसा बिबट्याचा असून तो थोडा पुसट आहे. त्याचे छायाचित्र वनकर्मचाऱ्यांना मिळाले आहे. त्यामुळे, या परिसरातील नागरिकांना दक्षता घेण्यास सांगितले आहे. बिबट्या दिसलेली ठिकाणे जंगलातील आहे. त्याच्याकडून माणसांना उपद्रव झालेला नाही. त्यामुळे, त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याचा प्रस्ताव नाही. हल्ला झालेल्या जनावरांच्या मालकांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे, असे कदम यांनी स्पष्ट केले. सिंहगडच्या जंगलात बिबट्याचा आणि खडकवासला धरणात मगरीचा वावर स्पष्ट झाला आहे. त्यामुळे, पर्यटक आणि ग्रामस्थांनी काळजी घ्यावी, असे आवाहन कदम यांनी केले.
Thursday, January 3, 2013
सिंहगड संरक्षण मोहीम सिंहगड पावित्र मोहिमेच्या वतीने "31 डिसेंबर सिंहगड संरक्षण मोहीम' सोमवारी आयोजित केली आहे. याअंतर्गत इ.स. 2000 पासून दर वर्षी 31 डिसेंबर रोजी बंदोबस्त केला जातो. यामध्ये मद्य, धूम्रपान व मासांहाराचे पदार्थ गडावर नेण्यास बंदी आहे. गडावर जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे, असे मोहिमेच्या वतीने नंदकिशोर मते व संतोष गोपाळ यांनी सांगितले.
रविवारीच झाली वर्षअखेरीची गर्दी
- सकाळ वृत्तसेवा
Monday, December 31, 2012 AT 12:42 AM (IST)
Tags: 31 december, khadakwasla
खडकवासला - नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने फिरावयास येणाऱ्या पर्यटकांनी आज रविवारच्या सुटीची संधी साधली आणि सिंहगड, खडकवासला व पानशेत परिसरात मोठी गर्दी केली होती.
वर्षअखेर सोमवारी आहे. त्या दिवशी सुटी नाही. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच पर्यटक सिंहगडाकडे येत होते. दुपारी एक वाजता सिंहगड घाटात वाहतूक ठप्प झाली होती.
त्यामुळे गडावर जाणारी वाहतूक काही काळापुरती थांबविण्यात आली होती. परिणामी डोणजे ते गोळवाडीदरम्यान वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर हवेली पोलिसांनी सिंहगडाकडे जाणारी वाहतूक डोणजे चौकातच थांबवली. गडावरील व घाट रस्त्यातील वाहतूक कोंडी सुटल्यावर वाहतूक सोडण्यात आली, असे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश भावसार यांनी सांगितले. रविवारी गडावर 45 हजार 840 रुपये उपद्रव शुल्क जमा झाले. चारचाकी सहाशे, तर दुचाकी 787 वाहने गडावर गेली. गडावर दारूची बाटली घेऊन आलेल्या एका व्यक्तीकडून शंभर रुपये दंड घेण्यात आला, तर बाटली वनविभागाने फोडून टाकली, असे भावसार यांनी सांगितले.
खडकवासला परिसर व सिंहगड पायथा परिसरात रविवार-सोमवारसाठी पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी ब्रिथ ऍनालायझर यंत्रे ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सिंहगड व धरण परिसरात अश्लील चाळे करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. वाहनचालकांनी गाडीची कागदपत्रे जवळ बाळगावीत, असे आवाहन पोलिस निरीक्षक शिवाजीराव देवकर यांनी केले आहे.
बारावी सिंहगड संरक्षण मोहीम
सिंहगड पावित्र मोहिमेच्या वतीने "बारावी 31 डिसेंबर सिंहगड संरक्षण मोहीम' सोमवारी आयोजित केली आहे. याअंतर्गत इ.स. 2000 पासून दर वर्षी 31 डिसेंबर रोजी बंदोबस्त केला जातो. यामध्ये मद्य, धूम्रपान व मासांहाराचे पदार्थ गडावर नेण्यास बंदी आहे. गडावर जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे, असे मोहिमेच्या वतीने नंदकिशोर मते व संतोष गोपाळ यांनी सांगितले.
Subscribe to:
Posts (Atom)








