Monday, October 29, 2012


ओढ्यात वाहत गेलेला "मोहित'सापडला ============== खडकवासला - खेळताना ओढ्यात पडलेला चार वर्षांचा मुलगा वाहून गेला. अंधार पडला तरी तो घरी न आल्याने शोधाशोध व रडारड सुरू झाली. शेजारचे तीन तरुण नदीच्या दिशेने शोधत गेले. त्या वेळी दाट झुडपातून कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने ते गेले असता आळूच्या बेटात ते कुत्रे मुलाच्या शेजारी उभे होते. ही घटना सिंहगड रस्त्यावरील रामनगर परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजता घडली. मोहित बाळू कावळे असे मुलाचे नाव आहे. ब्रह्मा हॉटेल चौकामागे रामनगर वस्तीत तो राहतो. वस्तीजवळच्या ओढ्यात वडगाव जलशुद्धीकरण केंद्र व ड्रेनेजचे पाणी सोडले असल्यामुळे, तो बारमाही वाहतो. मोहित सायंकाळी सहा-साडेसहा वाजण्याच्या सुमारास एकटाच खेळत होता. खेळताना अचानक तो पाण्यात पडला. त्या वेळी रस्त्याने जाणाऱ्या एका आजीला पाण्यात काही तरी पडल्याचा आवाज आला होता. दरम्यान, मोहित घरी न आल्याने त्याची आजी सखुबाई कावळे त्याला शोधू लागल्या. तो रामनगरमध्ये कोठेच सापडला नाही. त्यांनी घरी जाऊन ही हकिगत सांगितली. त्या वेळी रस्त्याने जाणाऱ्या आजींनी मघाशी पाण्यात काही तरी पडल्याचा आवाज आल्याचे सांगितले. त्यामुळे ओढ्यात शोधले; परंतु तो सापडला नाही. त्याला शोधण्यासाठी रामनगरमधील गणेश भांडवलकर, रवी राठोड व महेश मोरे हे तिघे जण ओढ्याच्या दिशेने पळत आले. ओढ्याच्या बाजूस असलेल्या झाडातून त्यांना कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. ते आवाजाच्या दिशेने गेले. त्या वेळी तो मुलगा आळूच्या पानाच्या बेटात अडकून पडल्याचे दिसले. त्याने आळूच्या पानाला धरले होते. त्या वेळी त्याच्या शेजारी कुत्रे होते. या तिघांनी मोहितची सुटका केली. तेथून काही अंतरावर एक छोटा सापही होता, असे त्या तिघा तरुणांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. ==========================================================

No comments:

Post a Comment